Monday, March 23, 2026

Latest Posts

रत्नागिरी जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा फडकवा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी : लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत चमत्कार घडवला. नगरपालिका, महापालिकांच्या निवडणुकीत चमत्कार घडवला आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये चमत्कार घडवतील असा विश्वास व्यक्त करताना रत्नागिरी जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा फडकवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील शासकीय जलतरण तलावा शेजारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, भाजपचे जिल्हा संयोजक दीपक पटवर्धन, शिवसेना-भाजप महायुतीचे पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नाही. पण सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणावेत यासाठी जन्माला आलो आहे. भविष्याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. तुमचे मत हे भविष्याला असणार आहे, विकासाला आणि हे होणाऱ्या कामांना असणार आहे. नेत्यांच्या निवडणुकीत कार्यकर्ते झोकून  देऊन काम करत असतात. त्यामुळे आता त्यांच्या निवडणुकीत नेत्यांनी त्यांचा प्रचार करणे महत्त्वाचे असते.”
“शिवसेना कोकणात जन्माला आली आणि कोकणात प्रत्येक घरात शिवसैनिक जन्माला आला. बाळासाहेब ठाकरे आणि कोकण यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. शिवसैनिकाला कोणी फसवू शकत नाही आणि फसवणूक करणार्‍या शिवसैनिक इंगा दाखवल्याशिवाय राहत नाही. रत्नागिरीत नगराध्यक्ष महायुतीचा निवडून आला. ३३ पैकी २९ जागा महायुतीने जिंकल्या. आता पुढील २-४ दिवस अशीच मेहनत करा, आणि विरोधकांना भुईसपाट करा, असे आवाहनही शिंदे यांनी केले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांचा विजय होण्यासाठी केलेली कामे सांगण्याची गरज नाही, असे सांगत ते म्हणाले की, “मी मुख्यमंत्री असताना अनेक योजना सुरू केल्या. अनेक प्रकल्प आपण पुढे नेले, अनेक उद्योग आणले. मुख्यमंत्री होतो तेव्हाही उद्योग मोठ्याप्रमाणात आणले आणि उद्योगमंत्री माझ्यासोबत आहेत. तेही मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात आणली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे दावोस येथे गेले होते. त्यांनी मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक करत महाराष्ट्रात कारखाने, उद्योग आणले आहेत. त्यामुळे येथील तरुणांना बाहेर उद्योगासाठी जाण्याची गरज नाही. तर भविष्यात त्यांना आपल्या जिल्ह्यातच रोजगार मिळणार आहे, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

मी उद्योगाला चालना देणारा व्यक्ती आहे. मी मुख्यमंत्री असताना माझ्याकडे आलेल्या विकासकामांची फाईल कधीच थांबवली नाही. एक मिनिटांत त्या फाईलवर सही करून पाठवून द्यायचो. पण आता कळतेय की मुख्यमंत्री असताना आपण किती प्रकल्पांना मान्यता दिली आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये देवेंद्र फडणवीस आणि मी महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नावर निर्णय घेतला. मी मुख्यमंत्री असताना माझ्या मुख्यमंत्री शेतकरी सन्मान योजना अशा अनेक योजना राबवल्या. लाडकी बहिण योजनेवरून विरोधकांनी आरोप केले. ४५ हजार कोटींचा वर्षाचा खर्च असलेल्या लाडक्या बहिणींची दर महिन्याला दिवाळी साजरी व्हावी यासाठी सातत्याने निर्णय घेतले. आज या योजनांमुळे अनेक कुटुंबे उभी राहिली. लाडकी बहिण योजना कधीच बंद पडणार नाही. २१०० रुपये लाडक्या बहिणींना मिळणार यासाठीदेखील आम्ही प्रयत्नशील आहोत, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

या अर्थसंकल्पात कोकणला न्याय मिळाला आहे, असे सांगतानाच कोकणच्या विकासात खोडा घालणार्‍यांना बाजूला करा. सर्वसामान्य जनतेला काय मिळाले हे पाहणारे आम्ही  आहोत. काही लोकं प्रॉपर्टी, संपत्ती, पैसे किती कमावले हे पाहणारे आहेत. यापेक्षा आम्ही माणसांचे प्रेम किती कमावले, माणसे किती कमावली हे पाहणारे असून खुर्ची आणि सत्तेचा आमचा अजेंडा नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

यावेळी बोलताना ना. एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीलाच दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केले. मनमोकळ्या मनाचा नेता हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.