रत्नागिरी: रत्नागिरीतील शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींसाठी येणारा मार्च महिना खऱया अर्थाने ऐतिहासिक पर्वणी ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास आणि त्यांचा पराक्रम नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ‘श्री शिवराज मंच‘ तर्फे एका विशेष उपक्रम म्हणून ‘शिवराज भूषण‘ या भव्य महानाटय़ रत्नागिरीत अवतरणार आहे. तर त्यादरम्यान शिवकालीन शस्त्रास्त्रs आणि दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
यासंदर्भात मंगळवार आयोजित पत्रकार परिषदेला निर्माता भूषण साटम, भाउ सामंत, संजय शिंदे, समीर शिंदे, दिनेश आंगणे, महेंद्र रावणंग, संकेत कुवेसकर उपस्थित होते. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेले ‘शिवराज भूषण‘ हे महानाटय़ रविवार, 22 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता सावरकर नाटय़गृह येथे सादर होणार आहे. कवी भूषण यांनी 1671 मध्ये रायगडावर प्रत्यक्ष महाराजांच्या शौर्याचे जे वर्णन आपल्या साहित्यातून केले होते, त्याच अजरामर काव्यावर या नाटकाची निर्मिती आधारित आहे. सुमारे 60 पेक्षा अधिक कलाकार, अंगावर शहारे आणणारे संगीत आणि विशेष प्रकाशयोजनेच्या माध्यमातून महाराजांची युद्धनीती आणि अष्टप्रधान मंडळाचे चोख नियोजन प्रेक्षकांना जिवंत अनुभवायला मिळणार आहे.
शिवकालीन शस्त्रास्त्रांचा ‘खजिना‘ व दुर्मिळ ग्रंथ पाहण्याची संधी
केवळ महानाटय़च नव्हे, तर इतिहासप्रेमी आणि विद्यार्थ्यांसाठी 20 ते 22 मार्च दरम्यान एक विशेष शैक्षणिक आणि ऐतिहासिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सावरकर नाटय़गृहाच्या तळमजल्यावर सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल. या प्रदर्शनात शिवकाळात शत्रूला पाणी पाजणारी तलवार, चपळ दांडपट्टा आणि अभेद्य ढाल यांसारखी महत्त्वाची शस्त्रास्त्रs एकाच छताखाली पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. शस्त्रास्त्रांसोबतच या प्रदर्शनात अनेक दुर्मिळ ग्रंथ आणि शिवकालीन इतिहास सांगणारी हस्तलिखिते प्रदर्शित केली जाणार आहेत. तसेच, महाराजांच्या पराक्रमावर आधारित विविध दर्जेदार पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्रीही येथे केली जाईल. यामुळे संशोधक आणि वाचकांसाठी ही एक मोठी वैचारिक मेजवानी ठरणार आहे.
इतिहास केवळ पुस्तकात वाचण्यापेक्षा तो डोळ्यांनी अनुभवल्यास अधिक प्रेरणा मिळते, असे मत श्री शिवराज मंचने व्यक्त केले आहे. रत्नागिरीतील तरुण पिढी, विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या समृद्ध संस्कृतीचा अभिमान जागृत करण्यासाठी या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंचतर्फे करण्यात आले आहे.



