रत्नागिरी : शहरातील उज्वल शिक्षण मंडळ रत्नागिरी संचलित, (रजि.) आगम द कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट महाविद्यालयाचा उद्घाटन समारंभ आज (१ एप्रिल) संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले हबीब तन्वीर राष्ट्रीय पुरस्कार विजेते तथा ज्येष्ठ रंगकर्मी सुहास भोळे यांच्या हस्ते संस्थेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
कोकण विभागातील विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कलात्मक दृष्टिकोन आणि कौशल्याधारित शिक्षणाची जाणीव निर्माण करणे या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. कला शिक्षण केवळ छंद म्हणून न पाहता, त्यामध्ये करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत ही जाणीव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा या संस्थेचा मूलभूत विचार आहे. कोकण विभागात गुणवत्ता, सर्जनशीलता आणि कौशल्य यांचा संगम असलेले कला शिक्षण विकसित करणे.
ग्राफिक डिझाइन आणि कम्युनिकेशन या विषयांच्या शिक्षण क्षेत्रात सुयोग्य बदल घडवून आणणे. त्यासाठी, काळाशी सुसंगत, अद्ययावत्, सुबद्ध आणि समतोल अभ्यासक्रम तयार करणे. विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास घडवून आणून, प्रत्यक्ष कामाच्या क्षेत्रात ते जेव्हा उतरतील त्या वेळी, जाणीव आणि कम्प्युटर ग्राफिक्सच्या विविध कौशल्यांचा वापर या दोन्ही गुणांचा संगम असेल असे शिक्षण देणे.
आपले विद्यार्थी स्वावलंबी, स्वतंत्र बुद्धीचे आणि कुशल कम्प्युटर ग्राफिक डिझाइनर्स व्हावेत हे असून कलात्मक दृष्टिकोन आणि तांत्रिक कुशलता यांचा त्यांच्या व्यक्तिमत्वात संगम असेल, अशा पद्धतीचे शिक्षण देणे, हे या संस्थेचे ध्येय आहे.
संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक प्रा. संदेश पालये यांच्या माध्यमातून ही संस्था आर्ट आणि क्रिएटिव्ह क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी सज्ज आहे.
या सोहळ्यास विनायक हातखंबकर, ॲड. महेंद्र मांडवकर, ॲड. राकेश सत्वे, नंदकुमार यादव, प्रा. पद्मजा पाटणकर, उदय शिंदे, महेंद्र सागवेकर, निलिमा शिंदे, संतोष गोरीवले, नम्रता शिंदे आदी मान्यवर आणि विद्यार्थी, पालक उपस्थित होते.



