Wednesday, May 13, 2026

Latest Posts

राज्याच्या निकालात ‘कोकण पॅटर्न’चा डंका’ सलग १५ व्या वर्षी कोकण अव्वल : दहावीचा निकाल ९७.६२ टक्के

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळाने आपला इयत्ता १० वीचा निकाल जाहीर केला असून, यंदा या विभागाने ९७.६२ टक्के निकालाची नोंद केली आहे. कोकण विभागांतर्गत येणाऱ्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण १.८२ टक्क्यांनी अधिक आहे. यंदा प्रथमच सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा अनिवार्य करण्यात आल्याने हे निकाल पूर्णपणे पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडले आहेत. विशेष म्हणजे, कोकण विभागाने स्थापनेपासून म्हणजे २०१२ पासून सलग १५ व्या वर्षी राज्याच्या निकालात आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.

जिल्हानिहाय आकडेवारीचा विचार करता, सिंधुदुर्ग जिल्ह्याने ९८.१३ टक्के निकालासह विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९७.३७ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या (२०२५) तुलनेत यंदा कोकण विभागाच्या एकूण निकालात १.२ टक्क्यांची किंचित घट पाहायला मिळाली आहे. २०२५ मध्ये हा निकाल ९८.८२ टक्के इतका होता. यंदा नियमित विद्यार्थ्यांसोबतच खाजगी विद्यार्थ्यांचा निकाल ७१.५७ टक्के, तर पुनरपरीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ३९.०३ टक्के लागला आहे. परीक्षेदरम्यान दोन्ही जिल्ह्यांत गैरमार्गाचा एकही प्रकार उघडकीस आला नाही, मात्र परीक्षोत्तर चौकशीत चार गैरप्रकार आढळून आले असून त्यातील दोन दोषी विद्यार्थ्यांवर मंडळाने कारवाई केली आहे.
ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी आहे, त्यांच्यासाठी ९ मे ते २३ मे २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

चौकट
विभागात पुन्हा ‘कन्या’रत्नच सरस!

कोकण विभागात यंदा एकूण २५,१७२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते, त्यापैकी २४,५७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १२,५२५ मुलांपैकी १२,५०३ मुले उत्तीर्ण (९६.७३%) झाली, तर १२,२४७ मुलींपैकी १२,०७० मुलींनी (९८.५५%) यशाची मोहोर उमटवली आहे.


चौकट

सीसीटीव्हीचा ‘वॉच’ यशस्वी

पारदर्शक निकालाचा ‘कोकण पॅटर्न’
यंदा रत्नागिरीतील ७३ आणि सिंधुदुर्गातील ४१ अशा एकूण ११४ परीक्षा केंद्रांवर १०० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. यामुळे कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवता आले असून निकालाची विश्वासार्हता वाढली आहे.

दृष्टीक्षेपात कोकण विभागीय मंडळ

वर्ष (मार्च) निकालाची टक्केवारी राज्याचा क्रमांक
२०१२  ९३.९४%.  ०१
२०१३  ९३.७९%  ०१
२०१४  ९५.५७%  ०१
२०१५  ९६.५४%  ०१
२०१६  ९६.५६%  ०१
२०१७  ९६.१८%  ०१
२०१८  ९६.००%  ०१
२०१९  ८८.३८%  ०१
२०२०  ९८.७७%  ०१
२०२१  १००.००%  ०१
२०२२  ९९.२७%  ०१
२०२३  ९८.११%  ०१
२०२४  ९९.०१%  ०१
२०२५  ९८.८२%  ०१
२०२६  ९७.६२%  ०१

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.