Tuesday, March 24, 2026

Latest Posts

जलवाहतुकीला प्राधान्य देणाऱ्या रो रो जलसेवेचा लवकरच शुभारंभ : ना. नितेश राणे

रत्नागिरी: रस्ता, रेल्वेसोबतच जलवाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार प्रयत्नशील असून त्याचाच भाग म्हणून लवकरच मांडवा, माझगाव ते रत्नागिरी, मालवण सागरी रो रो सेवा सुरु करण्यात येणार आहे, यामुळे जलद वाहतुकीला पर्याय उपलब्ध होतानाच नवा अध्याय या निमित्ताने राज्यात सुरु होईल अशी माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली.

रत्नागिरीमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या ना. राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि दळणवळण व्यवस्था भक्कम करतानाच रस्ते आणि रेल्वे सोबतच जलवाहतूक वाढावी यासाठी फडणवीस सरकार प्राधान्य देत आहे. त्याचाच भाग म्हणून येत्या गणेशोत्सवापर्यंत मांडवा आणि माजगाव येथून रो रो जलसेवा सुरु करण्यात येणार असून तिथून थेट रत्नागिरीपर्यंत तीन तासात तर मालवण, विजयदुर्गपर्यंत तब्बल साडेचार ते पावणे पाच तासात पोहोचता येणार आहे. या रो रो जलसेवेमध्ये जवळपास 100 गाड्या आणि 500 प्रवासी घेऊन माजगाव येथून सोडणार आहोत. यासाठी लागणारी मोठी बोट किंवा क्रूज महाराष्ट्रात किनारपट्टीकडे आली आहे. फडणवीस साहेब त्याची पाहणी करतील आणि लवकरच गणेश चतुर्थीच्यापूर्वी हि सेवा सुरु करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल असे ना. राणे यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांनी कोकणातीलच आमदाराकडे मत्स्य आणि बंदर हि खाती देऊन दूरदृष्टी दाखवली आहे, यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये वाढवण बंदर तर सुरु होत आहेच पण त्याचवेळी राज्यातील 15 बंदरांना अधिक बळकट करून त्यांना आर्थिक ताकद देण्याचे काम सरकार करत आहे. रत्नागिरीतील मिरकरवाडा या आर्थिकदृष्टया महत्वाच्या बंदरात यापूर्वी अनेक अनधिकृत गोष्टी घडत असत, त्यामुळे स्थानिक मच्छिमारांना त्याचा त्रास सहन करावा लागत असे, मात्र आता तेथील गैरप्रकार थांबवून बंदराचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी आमच्या खात्याने पावले उचलली असून 22 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद तिथल्या विकासासाठी करण्यात आली आहे, टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून जूनच्या पहिल्या आठवड्यात भूमिपूजन करण्याचा प्रयत्न आहे.  लवकरच मिरकरवाड्याचा विकास खऱ्या अर्थाने मार्गी लागेल असेही ना. नितेश राणे यावेळी म्हणाले.

गेल्या काही दिवसांमध्ये अवैध मासेमारी त्यातही एलईडी फिशिंगवर मोठ्या प्रमाणात केलेल्या कारवाया, द्रोणद्वारे होणारी कारवाई यामुळे अवैध मासेमारीवर नियंत्रण आणण्यात आम्हाला चांगले यश आले आहे, त्यामुळे मत्स्य उत्पादनातही वाढ झालेली दिसून येत आहे. त्याचवेळी येणाऱ्या कालावधीमध्ये जी शिस्त किनारपट्टीवर सागरी सुरक्षेच्या माध्यमातून आणायची आहे त्यात सुद्धा निश्चितपणे यशस्वी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यामागची भूमिका स्पष्ट करताना ना. नितेश राणे म्हणाले कि, वादळामुळे किंवा पावसामुळे जसे शेतकऱ्यांचे नुकसान होते तसेच ते मच्छिमारांचेही होते, त्यामुळे जी नुकसान भरपाई शासनाकडून शेतकऱ्यांना दिली जाते तीच नुकसान भरपाई मच्छीमारानाही अपेक्षित होती, मात्र हे निकषांमध्ये कसे बसवायचे हा प्रश्न होता, मात्र आता कृषी दर्जा दिल्यामुळे नुकसान भरपाई सह विमाचे लाभ, आवश्यक साधन सामग्री, शासकीय अनुदान तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी ज्या योजना सुरु केल्या आहेत त्याचाही लाभ आता शेतकऱ्यांसह मच्छिमारांना होणार आहे, असा निर्णय घेणारा महाराष्ट्र हे पहिला राज्य आहे म्हणूनच फडणवीस सरकारने घेतलेला हा निर्णय क्रांतिकारी आहे असे ते म्हणाले. तर जिल्हा बँका या आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँका म्हणून ओळखला जात होत्या, त्यांच्या असंख्य महत्त्वाच्या योजना आहेत. त्यामुळे ग्रामीण अर्थकारणाला बळ मिळते, त्याच योजना मच्छीमारानाही लागू करा त्या पद्धतीने निर्देश प्रत्येक जिल्हा बँकेला, विशेषतः किनारपट्टीवरील बँकांना द्या, राज्यातील गोड्या पाण्यातल्या मत्स्य शेती करणाऱ्यांना प्रोत्साहन द्या अशी मागणी राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. अनास्कर यांच्याकडे केली होती. ती मागणी मान्य करतानाच त्यांनी राज्य सहकारी बँकेच्या वतीने हजार कोटीच्या निधीची मच्छीमारांसाठी तरतूद केली असून योजना बनवण्याचे काम सुरू झाले आहे. मोठ्या प्रमाणावर मच्छिमारांना आर्थिक तरतूद राज्य सहकारी बँकेने केली आहे असेही ना. राणे यांनी सांगितले. तर सध्या सागरी मत्स्य उत्पादनात सहाव्या आणि गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायात सोळाव्या ठिकाणी असणाऱ्या राज्याला आगामी काळात पहिल्या पाच राज्यांमध्ये नेण्यासाठी आमचा प्रयत्न असेल असेही त्यांनी सांगितले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.