चिपळूण: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत कृषी क्षेत्रात अत्याधुनिक AI तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या संदर्भात सखोल चर्चा करण्यासाठी आदरणीय शरद पवार यांनी एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीच्या निमित्ताने आमदार शेखर निकम यांनी पवार साहेबांची भेट घेऊन या अभिनव पुढाकाराचे मनापासून स्वागत केले.
या महत्त्वपूर्ण बैठकीत कृषी उत्पादनवाढ, जलसंपत्तीचे योग्य व्यवस्थापन, हवामानानुसार स्मार्ट शेती तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करता येईल, यावर सविस्तर आणि विधायक चर्चा झाली. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये AI सेंटर स्थापन करण्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली.
या प्रयत्नांमागील मुख्य भूमिका स्पष्ट करताना आमदार शेखर निकम म्हणाले की, कोकणातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे हेच यामागचे उद्दिष्ट आहे. यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची साधने उपलब्ध होऊन त्यांच्या प्रगतीचा मार्ग सुकर होईल, अशी अपेक्षा आहे.



