Friday, July 17, 2026

Latest Posts

कामथे घाटासह अपघातप्रवण क्षेत्रांत तातडीने सुरक्षा उपाययोजना करा; रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत खासदार सुनील तटकरे यांचे निर्देश

रत्नागिरी, दि. १७ (जिमाका): “कामथे घाटासह जिल्ह्यातील विविध अपघातप्रवण ठिकाणी (ब्लॅकस्पॉट्स) तातडीने आणि प्रभावी उपाययोजना राबवून रस्ते अपघात रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत,” अशा सूचना संसदीय रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी दिल्या.
    जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित ‘संसदीय रस्ते सुरक्षा समिती’च्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर आमदार भास्कर जाधव यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभाग घेतला.
*कामथे घाटातील अपघातांवर तातडीने उपाययोजना*
खासदार श्री तटकरे यांनी कामथे घाटातील अपघातांच्या वाढत्या प्रमाणावर तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना तातडीने आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावर, घाटात दिशादर्शक व वेगमर्यादा फलक लावण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती कार्यकारी अभियंत्यांनी बैठकीत दिली.
याशिवाय खासदार श्री तटकरे यांनी खालील महत्त्वाचे निर्देश दिले:
दीर्घकालीन उपाययोजना: दरड कोसळण्याच्या घटनांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भूगर्भशास्त्रज्ञांशी चर्चा करून सविस्तर आराखडा तयार करावा.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त: सार्वजनिक ठिकाणी मोकाट जनावरे सोडू नयेत, यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणांनी मिळून व्यापक जनजागृती करावी.
कॅशलेस उपचार योजना: रस्ते अपघातातील बाधितांना गोल्डन अवरमध्ये (तातडीने) वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी शासनाच्या कॅशलेस उपचार योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी.
    बैठकीत आमदार श्री जाधव यांनी मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न उपस्थित केला. नगरपरिषद व ग्रामपंचायतींनी आपापल्या हद्दीत अशा जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा, तसेच अपघाताच्या वेळी महामार्ग पोलिसांशी समन्वय साधून त्वरित मदत पोहोचवावी, अशी सूचना त्यांनी केली.
आमदार किरण सामंत यांनी जिल्ह्यातील निवळी, हातखंबा, कापडगाव आणि वेरळ घाट या अत्यंत संवेदनशील व अपघातप्रवण ठिकाणी तातडीने सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची मागणी केली.

*पोलीस प्रशासनाची धडक कारवाई; अपघातांचे प्रमाण घटले*

जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सादरीकरणाद्वारे पोलिसांच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील ब्लॅकस्पॉट्स निश्चित करून तेथे ‘सुरक्षा ड्रम’ बसवणे, शाळा-महाविद्यालयांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करणे आणि मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई केल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात याचे अधिक सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.