रत्नागिरी: डिजिटल अरेस्टच्या नावाखाली रत्नागिरी शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाची १५,५५,२०० रुपयांची फसवणूक झाली आहे. मार्च ते एप्रिल यादरम्यान या व्यक्तीची फसवणूक झाली आहे.
पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या ज्येष्ठ नागरिकाला एक व्हिडिओ कॉल आला त्यातील व्यक्तीने आपण पोलीस महानिरीक्षक आहोत असे सांगितले या व्यक्तीने पोलिसांचा गणवेश परिधान केला होता तसेच त्याने ओळखपत्र दाखवले आणि तुमचा संबंध आतंकवादी भारत विरोधी संघटनेशी असल्याचे ज्येष्ठ नागरिकाला सांगितले तसेच त्यांच्याकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली. तुमचा खात्याचा आतंकवादी संघटनेने वापर करून त्यामधून दोन कोटी वापरल्याचा पुरावा दिला हे सर्व या व्यक्तींनी व्हिडिओ कॉल द्वारे त्या ज्येष्ठ नागरिकाला सांगितले. तसेच या व्यक्तीला गेल्या महिन्याभर व्हिडिओ कॉल करून डिजिटल अरेस्ट नावाखाली फसवणूक केली. यातूनच त्यांच्या बँक खात्यामध्ये १५,५५,२०० रुपये भरावयाला सांगितले. कालांतराने त्या ज्येष्ठ नागरिकाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रत्नागिरी सायबर पोलीस स्थानकात धाव घेतली संबंधित व्यक्तींवर सायबर पोलीस आणि गुन्हा दाखल केलेला आहे याचा तपास सायबर पोलीस करीत आहेत.
पोलिस दलाकडून आवाहन
याबाबत रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी बी महामुनी,आणि सायबर पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांनी नागरिकांना असे आवाहन केले आहे की “कोणीही पोलीस अगर सीबीआय अधिकारी / नॅशनल सिक्युरिटी विभाग/ इतर विभागातून बोलत आहोत असे सांगून तुमचे बँक अकाऊंट / सिमकार्डचा गैरवापर झाला असून त्याकरीता तुमची चौकशी करावयाची असल्याचे सांगून तुमची वैयक्तिक व बँकांची आर्थिक माहिती मागत असेल. तसेच अकाऊंट व्हेरीफिकेशन करीता पैसे ट्रान्सफर करा असे सांगत असेल, तर अशा कॉलवर विश्वास ठेवू नका. आपली वैयक्तिक/बँक खात्यांची माहिती कोणालाही देवू नका व अशा धमक्यांना बळी पडू नका.”



