रत्नागिरी: ग्रामदैवत श्रीदेव भैरी देवस्थानचा आषाढ महिन्यातील पालखी उत्सव व बळ कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार असून, उद्या शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी पहिली ग्रामप्रदक्षिणा होणार आहे. सकाळी १० वाजता श्रीदेव भैरीची पालखी मंदिरातून ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडणार आहे.
पालखी खालची आळी मार्गे मुरलीधर मंदिर, काँग्रेस भवन, टिळक आळी, झाडगाव येथील पटवर्धन व सावंत (खोत) यांच्या ठिकाणी थांबणार आहे. त्यानंतर जोशी पाळंद मार्गे परटवणे येथील खंडकर खोत यांच्या ठिकाणी जाऊन पुढे फगरठार येथील लांजेकर कंपाऊंडमधील सहाणीवर विसावणार आहे. पुढे अठरा हाताच्या गणपती मंदिर मार्गे फाटक हायस्कूल, गाडीतळ, गोखले नाका, मारुती आळी, तेलीआळी, कोतवडेकर सहाण येथे पालखी दाखल होईल. त्यानंतर मारुती आळी, प-याची आळी, धमाळीच्या पारावरून विठ्ठल मंदिर, मुरलीधर मंदिर, खालची आळी मार्गे रात्री १० वाजता पालखी भैरी मंदिरात परत येणार असून गाऱ्हाणे होऊन ग्रामप्रदक्षिणा कार्यक्रमाची सांगता होईल.
रविवार, दि. २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता भैरीचा बळ कार्यक्रम होणार आहे.
या सर्व धार्मिक उत्सवामध्ये बारा वाड्यातील गावकरी, मानकरी, ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भैरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र तथा मुन्नाभाऊ सुर्वे यांनी केले आहे.



