रत्नागिरी : नीटसह विविध स्पर्धा परीक्षांतील पेपरफुटीमुळे देशभरातील विद्यार्थ्यांच्या भविष्यावर आले संकट आणि दिल्लीतील आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ रत्नागिरीतूनही आता तीव्र आवाज उठला आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी गोगटे जोगळेकर महाविद्यालयासमोर स्वाक्षरी अभियान घेत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या अभियानाला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतील नाणीज बस थांब्यावर शाळकरी मुलींना बसमधून उतरवण्याचा प्रकार घडला होता. त्यावरही युवासेनेने आवाज उठविला होता, त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि न्यायासाठी युवासेना आक्रमक झाल्याचे दिसते.
युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचे नियोजन युवासेना रत्नागिरी तालुका अधिकारी संदेश नारगुडे आणि शहर अधिकारी आशिष चव्हाण, शहर समन्वयक रेहान मापारी, कॉलेज कक्ष जिल्हाप्रमुख पारस साखरे यांनी केले.
या अभियानात उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस, तालुका प्रमुख मयूरेश्वर पाटील, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना सह सचिव प्रद्युम्न माने, पंचायत समिती सदस्य सागर तांदळे, किरण तोडणकर, निखिल बने, आर्यन कोळेकर, सुफियान जयगडकर, प्रशांत सुर्वे, बंड्या सुर्वे, केतन शेट्ये यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, शिवसैनिक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.
युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी सांगितले की, जोपर्यंत दोषींवर कारवाई आणि शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात हे आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीने अधिक तीव्र करण्यात येईल.



