Tuesday, July 21, 2026

Latest Posts

विश्वनगरच्या भावेश चव्हाणचे ऐतिहासिक यश; नगरसेविका श्रद्धा हळदणकर, गणेश भारती अन् संजय हळदणकर यांच्याकडून कौतुक

रत्नागिरी : शहरातील विश्वनगर येथे राहणाऱ्या भावेश सुरेश चव्हाण याने ‘Re-NEET UG 2026’ परीक्षेत ‘एसटी’ प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम आणि देशात चौथा क्रमांक पटकावून ऐतिहासिक यश मिळवले आहे. कोणत्याही खाजगी शिकवणीशिवाय आणि अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाची दखल घेत, रत्नागिरी नगर परिषद प्रभाग क्रमांक ७ च्या नगरसेविका श्रद्धा हळदणकर, नगरसेवक गणेश भारती आणि विभाग प्रमुख संजय हळदणकर यांनी भावेशच्या निवासस्थानी जाऊन त्याचे पुष्पगुच्छ देऊन विशेष कौतुक केले. या दोन्ही लोकप्रतिनिधींनी आणि विभाग प्रमुखांनी भावेशला लिड देत त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीचा संपूर्ण रत्नागिरीला सार्थ अभिमान असल्याचे सांगत त्याच्या भावी डॉक्टर होण्याच्या प्रवासाला भरभरून शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी नगरसेविका श्रद्धा हळदणकर आणि नगरसेवक गणेश भारती यांनी भावेशच्या जिद्दीचे कौतुक करताना सांगितले की, एका सामान्य कुटुंबातील मुलाने केवळ स्वतःच्या मेहनतीवर, जवाहर नवोदय विद्यालय (पडवे, राजापूर) आणि लातूरच्या संत तुकाराम कॉलेजमधील मार्गदर्शनाच्या जोरावर देशपातळीवर मिळवलेले हे यश थक्क करणारे आहे. भावेश आजच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक मोठा प्रेरणास्रोत बनला असल्याचेही त्यांनी नमूद केले. तर विभाग प्रमुख संजय हळदणकर यांनी भावेशच्या या यशाने प्रभाग क्रमांक ७ चे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याचा आनंद व्यक्त केला.
या कौतुक सोहळ्याला उप विभाग प्रमुख अमित भाटकर यांच्यासह परिसरातील अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रमोद सावंत, प्रवीण भातादे, परशुराम खानविलकर, संदीप दमुष्टे आणि अक्षय केळकर यांनीही भावेशचे अभिनंदन करून त्याला पुढील उच्च शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यासोबतच महिला आघाडी व स्थानिक कार्यकर्त्या पौर्णिमा सावंत, समीक्षा वालाम, सानिका कुळ्ये आणि जान्हवी मुळे यांनीही भावेश आणि त्याच्या कुटुंबीयांचे कौतुक केले.
भावेशने मिळवलेले हे यश रत्नागिरीच्या मातीतील गुणवत्तेची मोठी साक्ष आहे. सर्व मान्यवरांनी त्याच्या आई-वडिलांचेही आभार मानले, ज्यांनी अत्यंत बिकट परिस्थितीत भावेशच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्याच्या शिक्षणाला बळ दिले. प्रभाग क्रमांक ७ मधील सर्व ज्येष्ठ आणि युवा पदाधिकाऱ्यांनी केलेल्या या उत्स्फूर्त स्वागतामुळे चव्हाण कुटुंबीय भावूक झाले होते, तर संपूर्ण परिसरातून भावेशवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.