रत्नागिरी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज जिल्ह्यात ठिकठिकाणी भव्य आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे आणि मोफत शस्त्रक्रियांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. वाढदिवसानिमित्त ‘आरोग्य सेवेचा जागर’ करण्याच्या या सामाजिक उपक्रमाला संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी तसेच दुर्गम भागात तळागाळातील जनतेपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने शासकीय आरोग्य केंद्रे आणि नामांकित खासगी रुग्णालयांच्या सहकार्याने या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यात या ठिकाणी पार पडली शिबिरे:
आरोग्य विभागाच्यावतीने जिल्ह्यातील अनेक उपकेंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांवर (PHC) मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
खेड तालुका: उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी आणि उपकेंद्र, धामणी.
दापोली तालुका: प्राथमिक आरोग्य केंद्र, उंबर्ले आणि साखळोली येथे.
चिपळूण तालुका: शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र, पिंपळी खुर्द.
लांजा तालुका: उपकेंद्र तळवडे-आडवली आणि उपकेंद्र, हर्चे.
इतर तालुके: ग्रामीण रुग्णालय रायपाटण (राजापूर), उपकेंद्र आंबडवे (मंडणगड), उपकेंद्र तुळसणी (संगमेश्वर) आणि खानू प्राथमिक आरोग्य केंद्र (रत्नागिरी).
याशिवाय, ग्रामपंचायत सावर्डे येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
मोफत शस्त्रक्रिया आणि विशेष तपासणी शिबिरे (वैशिष्ट्ये):
या मोहिमेत जिल्ह्यातील नामांकित वैद्यकीय संस्थांनी विशेष पुढाकार घेऊन रुग्णांना दिलासा दिला.
बी. के. एल. वालावलकर रुग्णालय, सावर्डे: या रुग्णालयाच्या वतीने तब्बल ८ लहान मुलांवर विविध प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यासोबतच हर्णे आणि पाच पंढरी येथेही विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
अपरांत हॉस्पिटल, चिपळूण: या रुग्णालयाच्यावतीने चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक कार्यालय आणि रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
नंदादीप आय हॉस्पिटल, रत्नागिरी: गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर पार पडले. यामध्ये अनेक विद्यार्थी व नागरिकांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली.
सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश
राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या विधायक उपक्रमामुळे जिल्ह्यातील हजारो गरीब व गरजू रुग्णांना थेट फायदा झाला आहे. प्रत्यक्ष आरोग्यसेवेचा लाभ जनतेला मिळवून दिल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



