रत्नागिरी : राज्यात वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी प्रभावी कारवाई करत सायबर फसवणुकीत वापरण्यात आलेल्या ११ म्युल अकाउंटधारकांविरुद्ध ११ स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय आर्थिक फसवणुकीतील तक्रारींचा वेगाने तपास करून पीडितांना लाखो रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यातही पोलिसांना यश आले आहे.
महाराष्ट्र सायबरकडून सायबर गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या Layer-1 बँक खाती, ATM आयडी, धनादेशाद्वारे पैसे काढण्याची माहिती, सिमकार्ड तपशील तसेच NCCRP पोर्टलवरील आर्थिक फसवणुकीची माहिती रत्नागिरी जिल्हा पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आली होती. या माहितीचे सखोल विश्लेषण करून पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत म्युल अकाउंटधारक, सिमकार्ड वापरकर्ते, एजंट, मध्यस्थ आणि इतर संबंधितांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले होते.
या मोहिमेदरम्यान सायबर फसवणुकीसाठी वापरण्यात आलेल्या ११ म्युल अकाउंटधारकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच जानेवारी २०२६ पासून NCCRP मार्फत प्राप्त पाच लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या २१ तक्रारींपैकी १४ तक्रारींमध्ये एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. याशिवाय Money Restoration Module (MRM) अंतर्गत नोंद झालेल्या १०३ व्यवहारांपैकी ६८ व्यवहारांमध्ये यशस्वी हस्तक्षेप करून एकूण ₹३,६०,७८४.५२ पैकी ₹२,४२,५९७.४१ रक्कम पीडितांना परत मिळवून देण्यात आली. तसेच Grievance Redressal Module (GRM) अंतर्गत प्राप्त झालेल्या १२ पैकी सर्व १२ तक्रारींचे यशस्वी निवारण करण्यात आले आहे.
रत्नागिरी पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, सायबर गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या म्युल अकाउंट्स, बनावट सिमकार्ड, आर्थिक व्यवहारांचे जाळे आणि संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष तपास सुरू असून अशा गुन्हेगारी नेटवर्कविरोधात कठोर कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपले बँक खाते, एटीएम कार्ड, चेकबुक, मोबाईल सिमकार्ड किंवा इंटरनेट बँकिंगची सुविधा वापरण्यास देऊ नये, तसेच ओटीपी कोणालाही सांगू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. कमिशन किंवा पैशांच्या आमिषाला बळी पडून बँक खाते अथवा सिमकार्ड इतरांच्या वापरासाठी उपलब्ध करून देणे हा गंभीर गुन्हा ठरू शकतो, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
सायबर फसवणुकीची घटना घडल्यास नागरिकांनी तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी. तसेच जवळच्या पोलीस ठाण्यातही त्वरित माहिती देण्याचे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी केले आहे.



