Tuesday, July 21, 2026

Latest Posts

रोहित शर्माच्या सल्ल्याची रत्नागिरीच्या अविराजने केली किमया; इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमध्ये पुन्हा अष्टपैलू जलवा!

नाबाद ११६ धावा, ४ विकेट्स आणि तिसऱ्यांदा ‘सामनावीर’ पुरस्कार
रत्नागिरी :
रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काऊंटी क्रिकेट लीगमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करत आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत चमकदार प्रदर्शन करत त्याने आपल्या संघाला आणखी एक संस्मरणीय विजय मिळवून दिला. नाबाद ११६ धावांची खेळी आणि ४ विकेट्सच्या जोरावर अविराजने पुन्हा एकदा ‘सामनावीर’ पुरस्कारावर नाव कोरले.

काही काळापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत इंग्लंडमध्ये सरावादरम्यान अविराजला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी अविराजने रोहितला त्रिफळाचीतही केले होते. त्यानंतर रोहितने त्याच्या खांद्यावर हात ठेवत मराठीतून, “क्रिकेटमध्ये मोठं व्हायचं असेल तर कठोर मेहनत कर आणि प्रत्येक सामन्यात जास्तीत जास्त धावा व विकेट्स मिळवण्याचं लक्ष्य ठेव,” असा मौल्यवान सल्ला दिला होता. हा सल्ला अविराजने मनापासून स्वीकारला असून त्याचे फलित आता इंग्लंडमधील कामगिरीत दिसून येत आहे.

शनिवारी मिडलसेक्स काऊंटी क्रिकेट स्पर्धेत झालेल्या सामन्यात पेशवा क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करत अविराजला सलामीला पाठवले. त्याने सुरुवातीपासून संयमी आणि आक्रमक खेळ करत ११५ चेंडूंमध्ये १५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ११६ धावा फटकावल्या. त्याच्या खेळीच्या बळावर संघाने ४३ षटकांत १८० धावांची मजल मारली.

१८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लंडन डेस्परॅडोज संघाला अविराजच्या भेदक गोलंदाजीचा सामना करता आला नाही. त्याने ९ षटकांत ४ महत्त्वाच्या विकेट्स घेत प्रतिस्पर्धी संघाची आघाडीची फळी उद्ध्वस्त केली. परिणामी, लंडन डेस्परॅडोजचा डाव १७० धावांवर आटोपला आणि पेशवा क्रिकेट क्लबने सामना आपल्या नावावर केला.

फलंदाजीत शतक आणि गोलंदाजीत चार विकेट्स अशा अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अविराज गावडे याने तिसऱ्यांदा ‘सामनावीर’ पुरस्कार पटकावत आपल्या उत्कृष्ट फॉर्मची पुन्हा एकदा प्रचिती दिली. रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.