रत्नागिरी : लग्नात बाधा नको म्हणून वायरने गळा आवळून प्रेयसी भक्ती मयेकर हिचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दुर्वास दर्शन पाटील याने गतवर्षी दोन खून केले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दोघेही दुर्वास पाटील याच्या बारमध्ये कामाला होते. भक्तीचा खुनाचा तपास करताना ही माहिती पुढे आली आहे. गतवर्षीच्या दोन्ही खून प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश जंगम आणि सिताराम वीर अशी खून झालेल्यांची नावे आहेत. दोघेही सायली बार मध्ये कामगार होते. या दोन खून प्रकरणातील दुर्वासचा साथीदार निलेश रमेश भिंगार्डे ( रा. सांगली) याला सोमवारी अटक करण्यात आली. त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या चार झाली आहे. राकेश अशोक जंगम रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथील रहिवासी होता. ६ जून २०२४ रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तो कपड्यांची बॅग घेऊन घरातून बाहेर पडला बराच काळ होऊनही तो परत न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली त्याच्या पत्ता न लागल्याने २१ जून २०२४ रोजी त्याची आई वंदना अशोक जंगम यांनी पोलिसात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. भक्तीचा खुनाची चौकशी सुरू असताना दुर्वास पाटील यांनी पोलिसांसमोर राकेश जंगम याचाही खून केल्याची कबुली दिली. दुर्वासने पोलिसांना सांगितले कोल्हापूरला जायचे आहे असे सांगून राकेश ला गाडीत सोबत घेतले. खंडाळा ते कोल्हापूर प्रवास दरम्यान राकेशचा गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने त्याचा मृतदेह आंबा घाटातील दरीत फेकून दिला. यामध्ये आपल्याला विश्वास विजय पवार व निलेश रमेश भिंगार्डे यांनी मदत केली आहे. भक्तीचा खून प्रकरणात दुर्वास आणि विश्वास पवार आधीच अटकेत आहेत आता पोलिसांनी निलेश भिंगार्डे यालाही अटक केली आहे.
बारमधील फुटेज ताब्यात
सोमवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी खंडाळा येथे भेट दिली आणि दुर्वास पाटील यांच्या सायली बार मधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यातून काही धागेदोरे हाती लागतात का याची माहिती घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले
राकेशच्याही आधी एक खून
राकेश जंगम याचा कुणाच्या आधी सिताराम वीर या कामगाराचा खून झाला असल्याचे तपासात पुढे आले. एका वादामुळे २०२४ मध्येच दुर्वासने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी होऊन वीर यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात दुर्वास आणि त्याच्या दोन साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल केला.



