रत्नागिरी: स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या परिसरातील महिला स्वयं-सहाय्यता समूहांनी दिवाळी निमित्त तयार केलेल्या आकर्षक वस्तूंची खरेदी करून भारतीय जनता पार्टी, रत्नागिरीच्या महिला कार्यकर्त्यांनी या गटांच्या मेहनतीला भरघोस प्रोत्साहन दिले. मराठा भवन रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या या विशेष उपक्रमात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी बचत गटातील महिलांनी कष्टपूर्वक तयार केलेल्या स्वदेशी सामानांची उत्साहाने खरेदी करून त्यांच्या आत्मविश्वासाला नवी झळाळी दिली. भारतीय जनता पार्टीच्या मध्य मंडळ अध्यक्ष सौ. सुचिताताई नाचणकर यांच्यासह सौ. अनुष्का शेलार, सौ. मेधा देवस्थळी, सौ. सुमन घाणेकर, सौ. शिवानी रेमुळकर या सर्व प्रमुख महिला कार्यकर्त्या या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांनी विविध प्रकारच्या कलात्मक आणि उपयुक्त वस्तू तयार केल्या आहेत. या वस्तू केवळ आकर्षक नसून त्या महिलांच्या कष्टाचे आणि कौशल्याचे प्रतीक आहेत. ‘स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन’ या धोरणाला अनुसरून, भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी या स्टॉल्सना भेट देऊन मोठ्या प्रमाणात स्वदेशी सामानांची खरेदी केली. केवळ खरेदीपुरता हा उपक्रम मर्यादित न राहता, भाजपाच्या महिला नेत्यांनी बचत गटातील महिलांशी संवाद साधला. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवून, त्यांच्या व्यवसायाला आणि स्वयंपूर्ण होण्याच्या प्रयत्नांना शुभेच्छा दिल्या. बचत गटातील महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासोबतच, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने भाजपाच्या या कृतीने एक आदर्श निर्माण केला आहे. यामुळे बचत गटातील महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी चांगला मोबदला मिळाला, तसेच त्यांच्या मेहनतीचे चीज झाल्याने त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली. अशा उपक्रमांमुळे स्वदेशी वस्तूंच्या वापराला चालना मिळून, ग्रामीण आणि शहरी भागातील महिला उद्योजकांना मोठे बळ मिळत आहे, असे मत यावेळी उपस्थित महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.



