Monday, March 23, 2026

Latest Posts

सुनीता साळवी अपघातप्रकरणी वाहनचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

रत्नागिरी : शहरातील लाला कॉम्प्लेक्स परिसरात १८ जानेवारी रोजी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपी कारचालकाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०५ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी मृत महिलेचे पती राजेश दिनकर साळवी यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. १८ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता गोगटे कॉलेज ते जेल नाका या वर्दळीच्या रस्त्यावर अखिल ताजुद्दीन पटेल याने त्याच्या ताब्यातील होंडा सिटी कार अत्यंत बेदरकारपणे व वेगात चालवत टीव्हीएस ज्युपिटर दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर बसलेल्या सौ. सुनीता राजेश साळवी (वय ५८) या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर आरोपी घटनास्थळी न थांबता पसार झाल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असतानाही आरोपीला तातडीने जामीन मिळाल्याने संताप व्यक्त होत आहे. आरोपी घटना घडल्यापासून दोन दिवस परागंदा होता. अटक झाल्यानंतरही पोलिसांनी पोलीस कोठडी न मागता न्यायालयीन कोठडीची मागणी केल्यामुळे त्याला जामीन मिळाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

घटनास्थळ हा अत्यंत अरुंद व वर्दळीचा रस्ता असून तेथे भरधाव वाहन चालवणे धोकादायक असल्याचे स्पष्ट असताना आरोपीने जाणीवपूर्वक निष्काळजीपणा केल्याचा आरोप आहे. अपघातानंतर जखमी महिलेच्या अंगावरून वाहन नेऊन पळ काढल्याने हा प्रकार केवळ अपघात नसून गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरत असल्याचे अर्जात म्हटले आहे.

या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजची कायदेशीर पूर्तता करून जप्ती, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे न्यायालयीन जबाब, आरोपीला मदत करणाऱ्यांना सहआरोपी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा अंतर्भुत करून आरोपीला मंजूर झालेला जामीन रद्द करून त्याला रत्नागिरी शहर सोडण्यास प्रतिबंध घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या घटनेमुळे शहरात संतापाची भावना असून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या महिलेचे पती यांच्या वतीने ॲड. संकेत घाग यांनी वकीलपत्र घेतले आहे आणि ते पीडित कुटुंबातर्फे कायदेशीर बाजू मांडत आहेत. 

या संदर्भात पोलीस अधीक्षक यांनी राजेश साळवी यांना आरोपी विरुद्ध योग्य आणि शक्य ती कारवाई निश्चितपणे केली जाईल, अशी ग्वाही दिली.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.