– आकाशवाणी केंद्राचे निवृत्त कार्यक्रमाधिकारी सुहास विद्वांस
पाली-
श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी संचलित डी. जे. सामंत महाविद्यालय, इंग्लिश मीडियम स्कूल, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने मोठ्या उत्साहात मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आकाशवाणी केंद्राचे निवृत्त कार्यक्रमाधिकारी सुहास विध्वंस, श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अण्णासाहेब सामंत, उपाध्यक्ष महेश सामंत, मराठा मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य कूशबा करे, सामंत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कांता कांबळे, इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका नूतन कांबळे, आयटीआयचे प्राचार्य सुहास मावळणकर, मराठी वाड्मय मंडळाचे प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे व्यासपीठावर उपस्थित होते. मराठी राजभाषा दिनानिमित्त ग्रंथदिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र संस्कृती दर्शन या ग्रंथदिंडीमध्ये घडवून आणले. लेझीम, पोवाडा, वासुदेव, कोळीनृत्य, वारकरी दिंडी, लाठीकाठी, भारुळ इत्यादी लोकसंस्कृती दर्शन ग्रंथदिंडीतून विद्यार्थ्याने घडवून आणले.
ग्रंथदिंडीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब सामंत, उपाध्यक्ष महेश सामंत, प्रमुख पाहुणे सुहास विध्वंस यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथदिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा, मराठी ग्रंथ व संस्कृती परंपरा याचे दर्शन घडविण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. यानंतर मराठी दिनानिमित्त महाविद्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य मराठी भाषा मंत्री मा. डॉ. उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे झाल्याचे कार्यक्रमाचे प्रमुख आकाशवाणी केंद्राचे निवृत्त कार्यक्रमाधिकारी सुहास विध्वंस यांनी गौरवोद्गार काढले. मराठी भाषेला अनेक वर्षे अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. हा संघर्ष खऱ्या अर्थाने डॉ. उदय सामंत यांनी मराठी भाषा मंत्रीपद मिळाल्यानंतर पाठपुरावा करून अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळवून देण्यात मोलाचे कार्य केल्याचे मत कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सुहास विध्वंस यांनी मत व्यक्त केले.
मराठी भाषा गौरवच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब सामंत यांनी आपल्या मनोगतात मराठी भाषा टिकविण्यासाठी सर्व मराठी माणसानी मनापासून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. पालीसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे दालन उपलब्ध करून दिले असून याचा लाभ विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली.
मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत मराठी वाड्मय मंडळाचे प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अभिजात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे मत व्यक्त केले. डी. जे. सामंत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे समूहगीत सादर केले. त्याचबरोबर इंग्लिश मीडियम स्कूलच्यावतीने समूहनृत्य सादर करण्यात आले. या सर्व कार्यक्रमातून मराठी भाषा व मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करण्यात आला. महाविद्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक अदिती दाणे व समीक्षा कांबळे, द्वितीय क्रमांक सुहानी माईन व बिंदिया पेजे, तृतीय क्रमांक सृष्टी सरफरे व विशाखा गुरव, उत्तेजनार्थ हर्षिता नवले व अपेक्षा घाटकर या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक ऋतिका मांडवकर, द्वितीय क्रमांक अनुष्का पर्वते, तृतीय क्रमांक शेजल गोताड या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. मराठी घोषवाक्य स्पर्धेत प्रथम क्रमांक सिद्धी ठीक, द्वितीय क्रमांक अनुष्का पर्वते, तृतीय क्रमांक ऋतिका दिवाळे या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कांता कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा तांबे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालय, इंग्लिश मीडियम स्कूल व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, सर्व शिक्षक वृंद, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी भाषा गौरवदिन यशस्वी होण्यासाठी श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटीच्या डी. जे. सामंत महाविद्यालयाचे, इंग्लिश मीडियम स्कूल, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.



