रत्नागिरी येथील मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमीत बुद्धिबळाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेणाऱ्या सात बुद्धिबळपटूंनी मागील काही कालावधीत विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करीत आतंरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त केले आहे.
रत्नागिरीत पार पडलेल्या कै. रामचंद्र सप्रे स्मृती राज्य अमॅच्युअर निवड व अजिंक्यपद क्लासिकल फिडे मानांकन स्पर्धेत राज्यातील २३ जिल्ह्यांमधून एकूण १४४ बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेत मॅजिक स्क्वेअरच्या बालबुद्धिबळपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करीत क्लासिकल फिडे मानांकन प्राप्त केले. बारा वर्षांच्या आयुष रायकर याने सर्व फेऱ्यांत मानांकन प्राप्त खेळाडूंचा सामना करीत आठ फेऱ्यांमध्ये पाच गुणांसह १६२७ क्लासिकल फिडे गुणांकन प्राप्त केले. तर साडे सात वर्षे वयाच्या आरव निमकर याने देखील चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत १४६० गुणांकनाला गवसणी घातली. शालेय बुद्धिबळपटू अलिक गांगुली व आराध्य गर्दे यांनी देखील अनुक्रमे १५११ व १४५९ इतके गुणांकन प्राप्त केले. तसेच युवा बुद्धिबळपटू कौस्तुभ हर्डीकर १४९९ व सात्विक मालंडकर १४२२ यांनी देखील उत्तम कामगिरी करीत प्रथमतःच क्लासिकल फिडे गुणांकन प्राप्त केले.
कोल्हापूर येथे पार पडलेल्या तृतीय भाऊसाहेब गणेश देशपांडे स्मृती रॅपिड रेटिंग स्पर्धेत नंदन दामले याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत १५५७ फिडे रॅपिड गुणांकन प्राप्त केले.
बुद्धिबळात फिडे मानांकन मिळवणे हा एका खेळाडूच्या प्रगतीतील पहिला महत्वाचा टप्पा मानला जातो. हे मानांकन खेळाडूच्या रेटिंग स्पर्धांतील कामगिरीवर आधारित असते. नवीन मानांकित खेळाडू तयार झाल्यामुळे स्थानिक स्पर्धा अधिक चुरशीच्या होतात तसेच खेळाडूंना जिल्ह्याबाहेर जाऊन अधिक मोठ्या स्पर्धा खेळण्यास प्रोत्साहन मिळू शकते.



