Wednesday, October 7, 2026

Latest Posts

शैक्षणिक इतिहासातील सुवर्णक्षण; केंद्रीय विद्यालयाचा प्रवेशोत्सव आणि टिळक विद्यालयाच्या पुनर्बांधणीचे लोकार्पण

टीकेला कामातून उत्तर ; भव्य शैक्षणिक हब बनवण्याचा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा निर्धार
रत्नागिरी : रत्नागिरीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत केंद्रीय विद्यालयाचा प्रवेश सोहळा आणि ऐतिहासिक टिळक विद्यालयाच्या पुनर्बांधणीचे लोकार्पण एकत्र होत आहे. रत्नागिरीसारख्या लहान शहरात केंद्रीय विद्यालय होऊ शकत नाही, अशी टिप्पणी करणाऱ्यांना आम्ही प्रत्यक्ष काम पूर्ण करून उत्तर दिल्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
    लोकमान्य टिळक नगरपरिषद शाळा क्र. २ येथे आयोजित या संयुक्त सोहळ्यात जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, केंद्रीय विद्यालयाचे सहाय्यक आयुक्त के. शंकरय्या, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, पंचायत समिती सभापती प्रविण पांचाळ, समाजकल्याण सभापती ॲड. सुयोग कांबळे, मुख्याधिकारी वैभव गारवे, केंद्रीय विद्यालय अंबरनाथचे मुकेश कुमार सिंह आदी उपस्थित होते. खासदार सुनील तटकरे यांनी या कार्यक्रमाला दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित राहून संदेश दिला.
    “महाराष्ट्रात यंदा मंजूर झालेल्या अवघ्या तीन केंद्रीय विद्यालयांपैकी एक आपल्या रत्नागिरीला मिळाले आहे. सोमवारी सुरू झालेल्या या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अवघ्या ७२ तासांत इतके दर्जेदार स्वागतगीत सादर केले, ही या शाळेच्या उच्च गुणवत्तेची पावती आहे,” असे कौतुकोद्गार डॉ. सामंत यांनी काढले. 
इमारतीसाठी ४० कोटींचा निधी
   “पालकमंत्री डाॕ. सामंत म्हणाले, सध्या टिळक विद्यालयाच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात शाळा सुरू झाली असली, तरी नाचणे येथील कायमस्वरूपी इमारतीसाठी केंद्र सरकारने तब्बल ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याचे बांधकाम लवकरच सुरू होत आहे. याबद्दल त्यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. केंद्रीय विद्यालयात मातृभाषेला प्राधान्य देत मराठी भाषा शिकवली जाईल, असा निर्णय या विद्यालयाने घेतला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
रत्नागिरी बनतेय ‘एज्युकेशन हब’
     आपल्या राजकीय प्रवासाची आठवण सांगताना डॉ. सामंत म्हणाले, “२००४ मध्ये आमदार झाल्यापासून स्वतःची एकही खासगी शिक्षण संस्था किंवा कॉलेज उभारले नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंजिनिअरिंग कॉलेज, बीएससी नर्सिंग, विधी महाविद्यालय, मरीन इंजिनिअरिंग आणि टाटांचे कौशल्य विकास केंद्र यांसारख्या दर्जेदार सुविधा सर्वसामान्य जनतेसाठी रत्नागिरीत आणल्या. हे रत्नागिरीचे शैक्षणिक दालन उभारताना सर्वसामान्यांच्या मुलांचे  भविष्य घडवणे हाच एकमेव उद्देश राहिला आहे.”
कोकणात ५० हजार कोटींची गुंतवणूक
   शैक्षणिक विकासासोबतच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर भर देत, “ज्याप्रमाणे नाशिकमध्ये गुंतवणूक आणली, त्याच धर्तीवर ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’च्या माध्यमातून कोकणासाठी ५० हजार कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक येत असल्याचे त्यांनी सांगितले.”
विद्यार्थ्यांसाठी नव्या संधींची कवाडे खुली – खासदार सुनील तटकरे
‘केंद्रीय विद्यालया’मुळे कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे आणि प्रगत युगाला साजेसे शिक्षण घेण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे, असा शुभेच्छा संदेश खासदार श्री. तटकरे यांनी दिला.
“भारत सरकारच्या धोरणानुसार देशभरात केंद्रीय विद्यालयांची स्थापना केली जात आहे. अशा विद्यालयांमुळे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सहज उपलब्ध होईल. त्याचबरोबर, मराठी भाषेला नुकताच ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळाला असल्याने मातृभाषेतून शिक्षण घेणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी उत्तम इंग्रजी शिक्षणाचीही आवश्यकता आहे.”
कोकण पॅटर्न’चा गौरव
“गेल्या अनेक वर्षांपासून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षांमध्ये ‘कोकण पॅटर्न’ने संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल क्रमांक पटकावला आहे. विशेषतः कोकणातील मुलींनी बाजी मारून राज्यासमोर आदर्श ठेवला आहे. अशा तीव्र स्मरणशक्ती व आकलन क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे विद्यालय भविष्याची पायाभरणी ठरेल.” केंद्रीय विद्यालयाच्या विकासासाठी अथवा आवश्यक पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांमधून जे काही सहकार्य लागेल, त्यासाठी आपण स्वतः तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार तटकरे यांनी दिली.
विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयीसुविधा पुरवण्यास नगरपरिषद कटिबद्ध – नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे
इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांना सुरुवात झाली असून, सुमारे १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रवेश घेतला आहे. रत्नागिरीकरांसाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या विशेष प्रयत्नांमुळे रत्नागिरीत अनेक उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा उपलब्ध होत असून, हे केंद्रीय विद्यालय त्याच प्रयत्नांचे फलित आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण आणि आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरवण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषद सदैव तत्पर आहे, अशी ग्वाही नगराध्यक्ष श्रीमती सुर्वे यांनी दिली. या विद्यालयातून शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी आनंददायी वातावरणात शिकून, सुसंस्कारीत होऊन देशाचा एक सक्षम आणि जबाबदार भावी नागरिक म्हणून घडेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मोबाईल बाजूला ठेवून मुलांच्या भविष्याकडे लक्ष द्या’- जिल्हाधिकारी मनुज जिंदल
मुलांच्या उज्ज्वल भविष्यामध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पालकांनी दररोज मोबाईल बाजूला ठेवून किमान एक ते दोन तास आपल्या मुलांना दिले पाहिजेत. त्यांना शिक्षणासोबतच एक चांगला नागरिक बनण्यासाठी योग्य दिशा देणे गरजेचे आहे. रत्नागिरी जिल्ह्याला भारतरत्न आणि अनेक मान्यवरांची मोठी परंपरा लाभली असून, पुढच्या पिढीमधूनही असेच आदर्श नागरिक घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरकारी शाळेपासून जिल्हाधिकारी पदापर्यंतचा प्रवास
आपल्या भाषणात त्यांनी बालपणाची आठवण सांगत नमूद केले की, ते मूळचे उत्तर प्रदेशातील सुरजपूर गावातील असून एका सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील बँकेत लिपिक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेसारख्या एका सरकारी शाळेतून सुरू झाले होते. आई-वडिलांचे आणि शिक्षकांचे परिश्रम यामुळेच आज आपण या पदापर्यंत पोहोचू शकलो, असे त्यांनी सांगितले.
  कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोनशिला अनावरण करुन लोकार्पण करण्यात आले.  विद्यार्थ्यांचे फूल आणि भेटवस्तू देवून स्वागत करण्यात आले. प्राचार्य अरुणकुमार यांनी स्वागत केले. कार्यक्रमास नगरसेवक, नगरसेविका, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.