Monday, March 23, 2026

Latest Posts

सायबर पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करणाऱ्याला दिल्लीतून अटक

रत्नागिरी: ‘मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन’ विभागातून बोलत असल्याची बतावणी करून एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल ६१ लाख १९ हजार ८० रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्याला रत्नागिरी सायबर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. राजीव विश्वनाथ तिवारी (वय ४७, रा. फैजाबाद, उत्तर प्रदेश, सध्या स्वरूप विहार, दिल्ली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेतील आरोपीने फिर्यादी ज्येष्ठ नागरिकाला संपर्क साधून ‘मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन’मधून बोलत असल्याचे सांगितले. त्यांचे सिम कार्ड बंद होणार असल्याची भीती घालून, त्यानिमित्ताने पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी कॉल फॉरवर्ड करत असल्याचा बनाव केला. त्यानंतर दुसऱ्या एका व्यक्तीने पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून फिर्यादीचे कॅनरा बँकेत खाते उघडले असून, त्या खात्यातून २ कोटी रुपयांचा ‘मनी लाँड्रिंग’चा व्यवहार झाल्याची भीती घातली. यामुळे घाबरलेल्या फिर्यादीला त्या बँक खात्यात रक्कम भरण्यास भाग पाडले आणि त्यांची ६१ लाख १९ हजार ८० रुपयांची फसवणूक केली.

याप्रकरणी सायबर पोलीस ठाणे, रत्नागिरी येथे गुन्हा रजिस्टर नंबर ०५/२०२४ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८ (४), ३१९ (२) ३ (५) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६ (सी), ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याच्या तपासकामी फसवणुकीच्या आर्थिक व्यवहारांबाबत बँकांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी राजीव विश्वनाथ तिवारी हा सध्या स्वरूप विहार, दिल्ली येथे असल्याचे निष्पन्न झाले. रत्नागिरी सायबर पोलिसांनी तातडीने दिल्ली येथे तपास पथक पाठवले. मोबाइल लोकेशन नसतानाही, स्थानिक बातमीदारांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याला न्यायालयासमोर हजर करून ४ दिवसांची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे कडील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती. स्मिता सुतार, पोहवा/१५७ रामचंद्र वडार, पोकॉ/७४ रोहन कदम, पोकॉ/१२०३ रामदास पिसे, पोहवा/१०४० संदीप नाईक, पोहवा/४४४ रमिज शेख यांनी ही कामगिरी यशस्वी केली.

नागरिकांना आवाहन:
पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ‘मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन’ / ‘नॅशनल सिक्युरिटी विभाग’ / किंवा इतर कोणत्याही विभागातून बोलत असल्याचे सांगून, तुमचे सिम कार्डचा गैरवापर झाला असून त्याकरिता चौकशी करावयाची असल्याचे सांगत कोणी तुमची वैयक्तिक किंवा बँकेची आर्थिक माहिती मागत असेल, तसेच ‘अकाउंट व्हेरिफिकेशन’साठी पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत असेल, तर अशा कॉल्सवर विश्वास ठेवू नका. आपली वैयक्तिक / बँक खात्यांची माहिती कोणालाही देऊ नका आणि अशा धमक्यांना बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.