गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे मंगळवार, दिनांक ५ मे रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त यात्रा उत्सव भरणार आहे. या उत्सवासाठी सुमारे ८० ते ९० हजार भाविक ‘श्रीं’च्या दर्शनाला येतील, असा अंदाज आहे. यात्रा उत्सवाची जाेरदार तयारी गणपतीपुळे येथे सुरू आहे.
श्रीदेव गणपतीपुळे संस्था, गणपतीपुळे ग्रामपंचायत, तसेच पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून यात्रा उत्सवाची तयारी करण्यात येत आहे. संपूर्ण मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ऐन पर्यटक हंगामात अंगारकी संकष्टी चतुर्थी आल्याने भाविकांची गर्दी हाेण्याची शक्यता आहे. या उत्सवासाठी घाटमाथ्यावरून माेठ्या प्रमाणात भाविक भेट देतात. भाविकांच्या साेयीसाठी दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. समुद्र चौपाटीवर कोणताही अपघात होऊ नये, यासाठी संस्थान श्रीदेव गणपतीपुळे सुरक्षारक्षक, तसेच ग्रामपंचायत जीवरक्षक व पोलिस तैनात करण्यात आले आहेत, तसेच ध्वनी प्रक्षेपण करून सूचना देण्यात येत आहेत. वाहनांची गर्दी टाळण्यासाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
————-
पहाटे उघडणार मंदिर
स्वयंभू ‘श्रीं’चे मंदिर पहाटे पूजाअर्चा, मंत्रपुष्प, आरती होऊन भाविकांना दर्शनासाठी पहाटे ३:३० वाजता उघडण्यात येणार आहे. संपूर्ण दिवसभर दर्शन खुले राहणार आहे. सायंकाळी ४:३० वाजता ‘श्रीं’ची पालखी प्रदक्षिणा मिरवणूक होऊन रात्री ११ वाजता मंदिर बंद होईल.
———-
पाेलिसांची करडी नजर
उत्सव काळात जयगड पोलिस स्थानकाचे निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची करडी नजर असणार आहे. यासाठी १८ पोलिस अधिकारी व १८० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.



