अष्टपैलू कामगिरीने पहिल्याच सामन्यात सामनावीराचा मान; ४८ धावा अन् ३ बळी घेत संघाला मिळवून दिला दणदणीत विजय
रत्नागिरी : इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्ये आपल्या अष्टपैलू कामगिरीची छाप उमटविणाऱ्या रत्नागिरीच्या अविराज अनिल गावडे याने आता ‘हंड्रेड बॉल’ फॉरमॅटमध्येही दमदार कामगिरी करत रत्नागिरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
भारतातील IPL प्रमाणेच इंग्लंडमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘The Hundred’ या क्रिकेट फॉरमॅटच्या धर्तीवर ब्रिटिश तमिळ क्रिकेट लीग (BTCL) तर्फे ‘Chera Cup’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात अविराजने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला.
अविराजने ‘Valvai Blue’ संघाचे प्रतिनिधित्व करताना फलंदाजीत आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. त्याने ३५ चेंडूंमध्ये ४८ धावा करत संघाच्या धावसंख्येला मोठे योगदान दिले. या सामन्या मध्ये प्रत्येक षटक हे पाच बॉलचे असते. अशी एकूण१०० बॉलची एक इनिंग असते. अविराज च्या खेळीच्या जोरावर Valvai Blue संघाने १४७ धावांची मजल मारली.
यानंतर गोलंदाजीतही अविराजने आपला जलवा कायम ठेवला. गोलंदाजी करताना अविराजने २० बॉलमध्ये ०.८० च्या सरासरीने अवघ्या २० चेंडूंमध्ये १६ धावा देत तब्बल ३ बळी घेत त्याने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीला मोठा धक्का दिला. अविराजच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर Valvai Blue संघाने विजय मिळवला.
सामन्यानंतर उपस्थित मान्यवर, खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींनी अविराजच्या या शानदार अष्टपैलू कामगिरीचे भरभरून कौतुक केले. पहिल्याच सामन्यात फलंदाजीत ४८ धावा आणि गोलंदाजीत ३ विकेट्स अशी प्रभावी कामगिरी करत सामनावीराचा पुरस्कार मिळवणे ही अविराजच्या क्रिकेट कारकिर्दीतील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.
विशेष म्हणजे, सध्या सुरू असलेल्या हंगामात अविराजने काउंटी क्रिकेट लीगमध्येही तीन वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे इंग्लंडच्या क्रिकेट मैदानावर रत्नागिरीच्या या युवा अष्टपैलू खेळाडूची सातत्याने होत असलेली दमदार कामगिरी चर्चेचा विषय ठरत आहे.
अविराज गावडेच्या या यशामुळे भारतासह रत्नागिरी जिल्ह्याचे नाव इंग्लंडच्या क्रिकेट मैदानावर उज्ज्वल झाले असून, त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रत्नागिरीतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.



