Saturday, August 1, 2026

Latest Posts

लोकमान्य टिळकांना मराठी पत्रकार परिषदेतर्फे अभिवादन

रत्नागिरी:-
भारतीय असंतोषाचे जनक, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ असा सिंहगर्जना करणारे महान स्वातंत्र्यसेनानी, प्रखर विचारवंत व ज्येष्ठ पत्रकार ‘लोकमान्य’ बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज रत्नागिरी येथे मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
       आज शनिवार, १ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ९ वाजता रत्नागिरी येथील ऐतिहासिक टिळक आळीमधील ‘लोकमान्य टिळक स्मारकात’ हा अभिवादन सोहळा पार पडला. यावेळी मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरीचे प्रमुख पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      अभिवादन सभेच्या सुरुवातीला लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांनी लोकमान्य टिळकांच्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील अतुलनीय योगदानाचा आणि त्यांनी ‘केसरी’ व ‘मराठा’ वृत्तपत्रांच्या माध्यमातून पेटवलेल्या वैचारिक क्रांतीचा गौरवपूर्ण उल्लेख केला.    लोकमान्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून जनजागृतीचे जे उत्तुंग कार्य केले, ते आजही देशातील प्रत्येक पत्रकारासाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे, अशा भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आल्या.
     लोकमान्य टिळकांच्या निर्भीड, समाजोपयोगी आणि राष्ट्रहित जपणार्‍या पत्रकारितेचा वारसा पुढे चालवण्याचा आणि सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारिता करण्याचा संकल्प याप्रसंगी उपस्थित पत्रकारांनी केला.
या कार्यक्रमाला मराठी पत्रकार परिषद रत्नागिरीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी लोकमान्य टिळकांच्या पवित्र स्मृतीस कृतज्ञतापूर्वक नमन केले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.