रत्नागिरी:
प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका तथा शिवसेना महिला शहर संघटक वैभवी खेडेकर यांच्या संकल्पनेतून प्रभागातील महिलांसाठी श्रावण महिन्याच्या निमित्ताने ‘सण श्रावणाचा, खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या कलागुणांना वाव देतानाच श्रावणातील उत्साह आणि आनंद द्विगुणित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या प्रसंगी नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे, प्रीती सुर्वे, श्रद्धा हळदनकर, पूजा पवार, निकिता कळंबटे, स्मितल पावस्कर, शाखाप्रमुख मयूर भुवड तसेच विभागप्रमुख शशी अलीम यांची प्रमुख उपस्थिती होती.
विविध मनोरंजक खेळ, प्रश्नमंजुषा आणि महिलांच्या सहभागातून कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित महिलांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. श्रावणाच्या पारंपरिक वातावरणाला आधुनिक मनोरंजनाची जोड देत हा उपक्रम आनंदात आणि उत्साहात पार पडला.
वैभवी खेडेकर यांच्या संकल्पनेतून व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांच्या प्रयत्नांतून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. या उपक्रमामुळे प्रभागातील महिलांना एकत्र येत आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी मिळाली.



