Saturday, February 14, 2026

Latest Posts

२३ व्या वर्षी केला गुन्हा, ७१ व्या वर्षी पोलिसांनी धरले

रत्नागिरी : वयाच्या २३ व्या वर्षी त्यांच्या हातून गुन्हा घडला. त्यांनी एका महिलेवर चाकूहल्ला केला होता. त्यानंतर ते पोलिसांना गुंगारा देत होते. कालांतराने त्यांना फरार घाेषित करण्यात आले. आता त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तीही तब्बल ४८ वर्षांनी. आता त्यांचे वय ७१ वर्षे आहे. कमाल गोष्ट म्हणजे आपल्या हातून काय गुन्हा घडला होता, याची त्यांना जराही आठवण नाही.एखाद्या क्राईमविषयक दिवाळी अंकातील किंवा एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी, अशी ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. ही संशयित आरोपी व्यक्ती आहे, चंद्रशेखर मधुकर कालेकर. त्यांना मंगळवार, १४ रोजी मुंबईतील कुलाबा पोलिसांच्या पथकाने दापोली तालुक्यातील करंजणी गावामध्ये अटक केली आहे. त्यांना मुंबईला नेण्यात आले आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कालेकर यांच्यावर १९७७ मध्ये मुंबईच्या लालबाग परिसरात एका महिलेवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. तेव्हा त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, कायदेशीर नोटीसचे उत्तर न देता ते अचानकपणे गायब झाले. त्यांची चाळ पाडण्यात आली. त्यानंतर त्यांनी सतत आपले वास्तव्य बदलले. सांताक्रूझ, गोरेगाव, माहीम, लालबाग अशा मुंबईच्या अनेक उपनगरांमध्ये आणि ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहून त्यांनी पोलिसांना चकवले होते. अखेर सत्र न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले.
अलीकडेच मुंबई पोलिसांनी फरार असलेल्यांच्या जुन्या फाईल्सची तपासणी सुरू केली. या प्रक्रियेदरम्यान, कालेकर यांचे नाव समोर आले. त्यांना शोधण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले. तब्बल सहा महिने अधिकाऱ्यांनी मतदार याद्या, सरकारी नोंदी आणि मानवी गुप्तचर स्रोतांचा वापर करून कसून चौकशी करत शोधाशोध केली. अखेर ते रत्नागिरी जिल्ह्यातील करंजणी (ता. दापाेली) या गावात झोपडीत राहात असल्याचे पोलिसांना कळले. स्वत:ला एकांतवासी म्हणून त्यांची ओळख होती. ते गावातील फार कमी लोकांशी बोलताना दिसायचे.
मंगळवार, १४ रोजी सकाळी पोलिसांच्या पथकाने त्यांच्या घरी जाऊन त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
………..

काहीच आठवत नाही
कालेकर घराबाहेर बसले असताना अचानक पोलिस तेथे आले. पोलिसांना पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आपल्याला अटक का करण्यात येत आहे, आपल्या हातून नेमका काय गुन्हा झालाय, यातले काहीच त्यांना आठवत नाही. वयामुळे त्यांना जुन्या गोष्टी आठवत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.