Saturday, February 14, 2026

Latest Posts

वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून कोकणाला दिशा देण्याचे काम: खासदार नारायण राणे

चिपळूण (प्रतिनिधी): वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत उभे राहिलेले कार्य आणि सलग तीन वर्षे चिपळूणमध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भरविण्यात येणारे भव्य कृषी प्रदर्शन पाहून आपण थक्क झालो असल्याचे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे यांनी व्यक्त केले. वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव हे सहकाराच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय व पशुधन व्यवसायात उल्लेखनीय काम करत असून, कोकणाला योग्य दिशा देण्याचे कार्य करीत आहेत, अशा शब्दांत त्यांनी प्रशांत यादव यांच्या कार्याचे कौतुक केले. चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील नगर पालिकेच्या सावरकर मैदानावर ५ ते ९ जानेवारी या कालावधीत भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. वाशिष्ठी डेअरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या वाशिष्ठी कृषी महोत्सवाचे उद्घाटन खासदार नारायण राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

यावेळी बोलताना राणे म्हणाले की, प्रशांत यादव यांनी हा प्रकल्प यापूर्वीच सुरू केला असता तर कोकण निश्चितच अधिक पुढे गेले असते. आज अनेक राज्ये पर्यटन, कृषी आदी माध्यमातून प्रगती करत आहेत; मात्र निसर्गसंपन्न असूनही कोकणाची अपेक्षित प्रगती झाली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तथापि, वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून प्रशांत यादव हे कोकणात चांगले काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उद्घाटनानंतर खासदार नारायण राणे व उपस्थित मान्यवरांनी कृषी महोत्सवाची पाहणी केली.

प्रास्ताविकात प्रशांत यादव यांनी सांगितले की, नारायण राणे यांनी कोकणाला वेगळी दिशा व ऊर्जा देण्याचे काम केले असून, त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण काम करत आहोत. गेल्या तीन वर्षांत वाशिष्ठी डेअरीने घेतलेली झेप सांगताना त्यांनी नमूद केले की, आज दररोज सुमारे ५५ हजार लिटर दूध संकलन होत असून, १३ हजारांहून अधिक शेतकरी व पशुपालक वाशिष्ठी डेअरीशी जोडले गेले आहेत. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून अनेक शेतकरी स्वावलंबी होत असून, शेती व पशुपालनाकडे वळत आहेत. या महोत्सवाची संकल्पना व यशस्वी आयोजनाचे संपूर्ण श्रेय त्यांनी आपली पत्नी स्वप्ना यादव व सहकाऱ्यांना दिले.

चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी प्रथम नागरिक म्हणून सर्व मान्यवरांचे स्वागत केले. प्रशांत यादव यांच्या कार्याचे कौतुक करताना त्यांनी दरवर्षी होणाऱ्या या कृषी महोत्सवासाठी नगरपालिकेचे सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.

खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सांगितले की, कोकणात फलोत्पादन वाढावे व शेतीचे उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रशांत यादव हे वाशिष्ठी डेअरी व चिपळूण नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुढे आणत असून, कोकणात कृषी क्षेत्रात एकप्रकारची क्रांती घडवत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर, देवरूखच्या नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, युवा नेते अनिरुद्ध निकम, भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, खेडच्या नगराध्यक्ष माधवी बुटाला, गुहागरच्या नगराध्यक्ष नीता मालप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच सौ. नीलमताई राणे, माजी आमदार डॉ. विनय नातू, माजी आमदार सदानंद चव्हाण यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळी यांनी केले, तर स्वप्ना यादव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.