Wednesday, August 5, 2026

Latest Posts

भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनल उभारणीला गती; रत्नागिरीच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला नवी दिशा – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. ५ : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर येथे अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल विकसित करण्याच्या प्रकल्पाला गती देण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे कोकणातील सागरी पर्यटन, स्थानिक रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

भगवती बंदर, ता. जि. रत्नागिरी येथे क्रुझ टर्मिनल विकसित करण्याबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री नितेश राणे म्हणाले की, कोकण किनारपट्टीची नैसर्गिक संपन्नता, ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन क्षमता लक्षात घेता भगवती बंदर येथे विकसित होणारे क्रुझ टर्मिनल राज्याच्या सागरी पर्यटन क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील आणि रत्नागिरी पर्यटनाच्या जागतिक नकाशावर अधिक ठळकपणे झळकेल.

मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन कोकणातील बंदर विकास आणि सागरी पर्यटनाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. भगवती बंदर येथे उभारण्यात येणारे अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल हे रत्नागिरीसह संपूर्ण कोकणच्या पर्यटन, व्यापार आणि रोजगारवाढीला नवी दिशा देणारे महत्त्वाकांक्षी पाऊल ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, क्रुझ टर्मिनलमुळे स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. हॉटेल, वाहतूक, पर्यटन मार्गदर्शक, हस्तकला, मत्स्यव्यवसाय आणि लघुउद्योग अशा विविध क्षेत्रांना या प्रकल्पाचा थेट लाभ होणार आहे. स्थानिक व्यावसायिकांना नव्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊन परिसराच्या आर्थिक विकासाला गती मिळेल.

प्रकल्पाची सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनाने आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून पर्यावरणीय मंजुरीसह इतर आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. तसेच टेक्नो इकॉनॉमिक फिजिबिलिटी स्टडी (TEFS) पूर्ण झाली असून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) अंतिम करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

मंत्री राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींची पूर्तता करून प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक जनतेच्या हिताला प्राधान्य देत आधुनिक सुविधा, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास या तत्त्वांवर हा प्रकल्प उभारण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.