Wednesday, November 4, 2026

Latest Posts

खेडशी येथील भंडारवाडी ओढ्यावर श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

भूजल सर्वेक्षण यंत्रणा व ग्रामस्थांचा संयुक्त उपक्रम; उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करण्यास होणार मदत


रत्नागिरी : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नैसर्गिक जलप्रवाहांचा योग्य वापर करून भूजल पुनर्भरण करण्याच्या उद्देशाने, ग्रामपंचायत खेडशी येथील भंडारवाडी ओढ्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (GSDA), रत्नागिरी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच खेडशीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या संयुक्त सहभागातून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. या ओढ्यातून वाहून जाणारे पावसाळ्यानंतरचे पाणी या वनराई बंधाऱ्यामुळे अडवले गेले असून ते जमिनीत मुरण्यास मदत होणार आहे. परिणामी, परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी व खासगी सिंचन विहिरींच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होईल. तसेच ओढ्यावरील भूजलावर आधारित इतर जलस्रोतांचे बळकटीकरण होऊन उन्हाळ्यातही पाणीपातळी टिकून राहण्यास मोठी मदत होणार आहे. या उपक्रमामुळे आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी होणार असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
    हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व ग्रामसेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमावेळी वरिष्ठ भूवैज्ञानिक संतोष गोंधळी, सहायक भूवैज्ञानिक चारुशीला देसाई यांच्यासह भूजल सर्वेक्षण कार्यालयातील इतर अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  “भूजल पुनर्भरण करणे ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत सहज मुरवता येते. याचा थेट फायदा परिसरातील सार्वजनिक नळपाणी पुरवठा विहिरींना तसेच शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींना होतो, ज्यामुळे संभाव्य टंचाईवर बऱ्याच अंशी मात करता येते. वनराई बंधारे बांधण्यासाठी योग्य जागेची निवड कशी करावी व भू-स्तर कसा असावा, याबाबत आमच्या कार्यालयाकडून तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते.” — संतोष शंकर गोंधळी, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.